Monday 2 April 2018

क्रशवाली स्टोरी - He Is My Crush


     प्रत्येकाला एक अशी व्यक्ती आवडते जी त्याची क्रश असते.  पण क्रश असणारी व्यक्ती हे आपले प्रेमंच असते असं नाही.  आपल्या प्रेमाला आपल्या क्रशबद्दल सांगतानाचा विश्वास आणि योगायोग ह्या गोष्टीबद्दल ही कथा आहे.

     अनघा... सातवीत असतांनाच प्रेमात पडली.  खरं तर प्रेम करण्याचं हे वय नाहीच म्हणा पण प्रेम म्हणजे काय तेही माहीत नसताना त्याच्या नावावरही खुश होणारी.  कधी पाणीपुरी तर कधी वडापाव खाण्याच्या बहाण्याने जाता येता तिला त्याच्या घराचा दरवाजा दिसायचा.  कधी तो उभा दिसायचा तर कधी मानलेल्या सासू बाई.  ज्या दिवशी दिसणार नाही त्या दिवशी बाई अभ्यासात पण त्यालाच शोधायच्या.  बाजारात भाजी आणयलाही आवडीने जाणाऱ्या आपल्या लेकीचं आईला कौतुक भारी, तर हिला मात्र त्याच्या नुसत्या दिसण्याचं.  पोरगा नुसता दिसायलाच नाही तर बुद्धीनेही हुशार.  पूर्ण कुटुंब एकमेकांच्या ओळखीतलेच.  त्यामुळे त्याच्या बद्दलची जमेल तितकी माहिती अनघा मिळवायची.  अर्थात हे करत असताना कोणालाही शंका येणार नाही हे पाहूनच.  दोघेही एकाच वयाचे मात्र शाळा आणि माध्यम दोन्हीही दोन टोकाचे.
    
     ह्या प्रेमात तर्फी न्हवती... होती ती बर्फी... निखळ प्रेमाची. असो. असे हे प्रेम सातवीपासून तब्बल पंधरावी म्हणजे ग्रॅज्युएशन होईस्तोवर कोणाला कळू दिले नाही. तब्बल 9 वर्ष तिने त्याला पाहण्यातच घालवले. खरं तर हेच का प्रेम हेही तिला जाणून घ्यायचे नव्हते, तिला फक्त त्याला पहायचे होते. वर्ष सरत होते, दिवस पळत होते. दोघेही शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागले होते. हिने एकदाही त्याच्या मनात कोणी आहे का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
     
     अचानक एके दिवशी अनघाला कळते की त्याची अगोदरपासून गर्लफ्रेंड आहे. नाराजीतेने अनेक प्रश्न स्वतःला करते... आपण त्याला आधीच सांगितलं असतं तर.. आपण उशीर केला... वैगरे वैगरे... क्षणातच स्वतःला सावरत ती विचारते... 9 वर्ष फक्त त्याला पाहण्यात घालवली... ह्यात खरंच तुला प्रेम होतं की अजून काही?.. नो नो नो... इट्स नॉट लव्ह... अँड इट्स अलसो नॉट ऍटरॅक्शन... आणि नक्कीच हे चुकीचंही नाही... इट्स सॅमथिंग क्रेझिनेस... येस... आय हॅव क्लिअर वेरी स्पेशल थिंग... ओ येस... ही इज माय क्रश... फॉरेव्हर क्रश?.... हा हा हा... येस... अनघा एक क्लीन क्लिअर व्यक्तीमत्व आणि तितकीच डॅशिंग.  पिक्चर अभी बाकी है... करत अनघा सगळे विचार झटकून नॉर्मल झाली.
     
     अनघाला ह्या गोष्टीतून बाहेर यायला फारसा वेळ लागला नाही... मुळात तिला तिच्या भावना स्पष्ट होत्या.  आणि तिला स्वतःच्या भावनांची कदर आणि आदर दोन्हीही भरभरून होत्या.  भटकंती सोबत फोटोग्राफी करणं हा तिचा सर्वात आवडत छंद. ह्यातच तिचा नवीन ग्रुप जोडला गेला.  सर्वांशी बिनधास्त बोलणारी आणि सर्वांमध्ये लगेच मिसळणारी अनघा अनिशला बघता क्षणीच आवडली होती.  अनेक ट्रेकिंगच्या वेळेस एकत्र मौजमजेत दोघेही एकमेकांना चांगले ओळखायला लागले होते.  आवड ह्या प्राथमिक स्थराने आता द्वितीय स्थराचा टप्पा गाठला होता.  फोन वरच्या गप्पा, चॅटिंग एव्हाना सुरू होऊन गाडी रुळावर आली होती.  बस 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' हा सीन प्रतीक्षेत होता.
     
   क्लीन क्लिअर स्पष्ट अनघा आणि प्रेमळ समझदार, तितकाच सहज स्वभावाचा अनिश.  दोघांची जोडी तितकीच छान आणि तितकीच हलकी फुलकी. बोलताना मनातलं सर्व शेअर करणाऱ्या अनघाने अनिशला तिच्या क्रश विषयीची गोष्ट, तिच्या भावना सर्व काही त्याच्याशी शेअर केलं.  अनिशनेही तितक्याच हळुवारपणे तिच्या भावनांचा आदर केला.  मात्र दोघांनी अधिक काही न बोलता विषय तिथेच थांबवला.  अनघाला आपण अनिशशी जे काही बोललो त्याचा अनिश राग तर करणार नाही ना? ह्या विचाराने थोडी काळजी वाटली.
    
    दुसऱ्या दिवशी अनिशने तिला फोन केला आणि आपण त्याला भेटलो असल्याचे सांगितले.  अनघाला तिच्या कानावर विश्वास तर बसेना, मात्र नक्की काय झाले हेही तिला कळेना.  कारण तिचं अनिशवर खरं प्रेम होतं आणि ह्याची जाणीव दोघांनाही होती.  अनघाच्या मनावरचं दडपण अनिशलाही जाणवायला लागले.  तो काही बोलणार तितक्याच अनघा अनिशची माफी मागून त्याला पुन्हा पुन्हा आपल्या प्रेमाची कबुली देऊ लागली... अनिश कसलाही चुकीचा विचार करू नकोस, मला फक्त तो आवडायचा आणि त्यापलीकडे कोणतंच नात कधीच नव्हतं. अनघाला कोणत्याही क्षणी रडू येईल हे जाणून अनिशने तिला शांत राहण्यास सांगितले.
     
     योगायोग कसा असू शकतो ह्याचे हे उत्तम उदाहरण.  दोघेही संध्याकाळी ठरलेल्या ठिकाणी भेटले. अनघा मी भेटलो त्याला... अनिशच्या ह्या बोलण्याने राग, काळजी, उत्सुकता ह्या सगळ्याच भावना अनघाच्या नजरेत दाटून आल्या होत्या.  आपण फक्त बोललो आणि ह्याने सरळ त्याला शोधून त्याची भेट घेणं हे अनघाला विचारात पाडणारे होते.  हा आपली मस्करी तर करत नाहीये ना? अनिशच्या स्वभावाचे पैलू बघण्यात हरवलेल्या अनघाला अनिशने मोठ्याने हसून भानावर आणले.  तिला प्रेमाने मिठी मारत तिचा हात हातात घेतला... आय लव्ह यु अनघा.  अनिशच्या बोलण्याने अनघा अजूनच गोंधळात पडली.

     तू काल बोलताना त्याच्याविषयी आणि झालेल्या गोष्टीविषयी माझ्याशी सर्वच सविस्तर शेअर केलेस.  अनघा... मीही या गोष्टी वर जास्त काही विचार केलाच नाही. आज ऑफिस मध्ये सकाळी अचानक तो समोर आला आणि तुझ बोलणं आठवलं. खरं तर तू सांगत होतीस तेव्हाच मला हा आठवला.  कारण तू त्याचे केलेले वर्णन.. त्याची गर्लफ्रेंड त्यांचे प्रेम. त्याच्या सगळ्या गोष्टी मी कॉलेजपासून पाहिले आहे.  आणि तू सांगताना त्या हुबेहूब जुळल्या होत्या.  मात्र सर्वात मोठा योगायोग असा की तो कॉलेज लाईफनंतर आज प्रथमच भेटला आणि तेही तू मला जेव्हा बोललीस त्याच्या दुसऱ्याच दिवशी.  मला खूप गंमत वाटली... आणि अनघा... तुझ्यावरचं प्रेम विश्वास अधिकच वाढलं.

     अनघा... तो आणि मी आम्ही एकाच कॉलेजमध्ये... एकाच वर्गात... आमची खूप छान मैत्री आहे... आणि हो त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल आम्हाला सर्वांनाच माहीत होतं की ते खूप सिरिअस कपल आहेत. हम्म... ते लहानपणापासून प्रेम करतात हे नंतर कळालं मला पण माझा सातवी पासून क्रश आहे तो... म्हणजे ती माझ्या नंतर आली.. अनघाच्या ह्या बोलण्याने दोघेही मनापासून हसत एकमेकांच्या मिठीत विसावले.  विश्वासाचं नात नकळत दृढ झालं होतं.
'दिलवाले दुल्हन ले जाएंगे' च्या हटके क्रशवाल्या स्टोरीचा... प्रेमाचा वटवृक्ष विश्वासाच्या फुलांनी बहरला आहे... त्यावर सुंदर गोड फळेही आली आहेत.

                                                                                            - अनुप्रिया सावंत.

मागील कथा वाचा                                                                                                           पुढील कथा वाचा

No comments:

Post a Comment

Thank You For Sharing Your Valuable Feedback.