Sunday 5 June 2016

जागतिक पर्यावरण दिन!!!

     आज ५ जून हा दिवस संपूर्ण विश्वात 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. ५ जून १९७२ रोजी बदलत्या हवामानाविषयी स्टॉकहोम येथे पहिले विचारमंथन करण्यात आले, म्हणूनच त्या दिवसापासून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जाऊ लागला.


     आज आपण पाहतो उष्णता खूप अधिक प्रमाणात वाढली आहे. येणाऱ्या पावसाळ्या नंतर जसा हिवाळा येईल तसाच पुढील उन्हाळा अधिक उग्र स्वरूप धारण करून येईल. २००५ चा २६ जुलै हा अजूनही प्रत्येकाच्या स्मरणात असेलच. त्याला कारणही पर्यावरणातील असमतोल हाच होता. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल, पर्यावरणाचा व वन्यजीवांचा ऱ्हास अश्या विविध गोष्टींमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा महाराक्षस समोर उभा राहिला आहे. 

     सध्याच्याच घटना... डम्पिंग ग्राउंडविषयी आपण सर्वांनी ऐकले तर काही जणांनी प्रत्यक्षात अनुभवले. तिथल्या कचऱ्याचे विघटन होण्याअधिक राजकारणच अधिक झाले. त्याचे परिणाम मात्र भोगावे लागले ते तेथील स्थानिकांना आणि पर्यायांनी आपल्या सर्वांनाच. त्यातून जे वायुप्रदूषण झाले, श्वसनविकार झाले, शारीरिक मानसिक समस्या निर्माण झाल्या ते निराळेच. वास्तविक पाहता प्रत्येक घरात ओला कचरा आणि सुका कचरा अशी वर्गवारी केल्यास डम्पिंग ग्राउंडवर केवळ २० टक्के कचरा जाऊन पडेल. आज मुंबईसारख्या शहरात नऊ हजार टन कचरा गोळा केला जातो. घराघरात जर ह्या सुका आणि ओला कचऱ्याची वर्गवारी केल्यास डम्पिंग ग्राउंडवर पडणारा कचरा केवळ १५०० ते १८०० टन होईल. (रेफेरेंस बाय गुगल सर्च इंजिन) हल्ली रस्त्यावरील ट्रफिक जॅम आणि भरमसाट वाहने ह्यामुळे वायुप्रदूषणात भरच पडत आहे.

     ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साइड ह्यांचे
ही प्रमाण संतुलित नाही. ह्याला कारण झाडांची झालेली कत्तल आणि गळती, ह्याला जबाबदारही मानवच. उन-पावसात आधार देणारे झाडे आज आपल्याला शोधावे लागतात. पण तरीही आजच्या युवा पिढीचे ह्या बाबतचे बदलते मत प्रत्यक्षात दिसत आहे. अनेक ठिकाणी 'वृक्षारोपण' उपक्रम सुरु करण्यात आलेले आहे, त्याचप्रमाणे कार्यक्रमात देखील आपण बघतो की 'छोटे रोपटे भेट' म्हणून आलेल्या पाहुण्यांना दिले जात आहेत. ही बदलती मानसिकता प्रत्येकात निर्माण होणे गरजेचे आहे, आणि त्याहूनही अधिक त्यासाठी प्रत्यक्षातले प्रयास.

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावरून त्यांच्या पहिल्याच भाषणात भारतातील स्वच्छतेच्या प्रश्नाविषयी आवाहन केले होते.  ते म्हणाले होते की, '१२० कोटी लोकसंख्येच्या देशाने जर स्वच्छतेचा निश्चय केला तर आपला देश अस्वच्छ करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही, म्हणून देशाचा कानाकोपरा स्वच्छ करण्याचा निश्चय प्रत्येकाने करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.'
 
     'जागतिक पर्यावरण दिन' ह्या निमित्ताने सर्वांनी मिळून निश्चय करू की, 'पर्यावरणाची हानी होणार नाही, असा एक तरी संकल्प मी करेन.' आणि तो कसोशीने पाळण्याचा आग्रह असेन.  मग त्यात माझा खारीचा वाट हा नक्कीच असणारंच.

     चला तर मग घेऊयात वसा आपल्या वसुंधरेच्या सुंदरतेचा!!!
 
                                                              अनुप्रिया सावंत.
 


मागील कथा वाचा                                                    पुढील कथा वाचा 

1 comment:

  1. डंंम्पिंग ग्राउंडचे सत्य अतिशय परखडपणे मांडलेस, अनुप्रिया!! कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि वृक्शकमी!! प्रत्येकाचीच जबाबदारी वाढली आहे आज सृष्टीची काळजी घेण्याची!!

    ReplyDelete

Thank You For Sharing Your Valuable Feedback.