Friday 3 May 2024

लघुकथा #1 - सकारात्मकता (Be Optimistic)!


चिनू शाळेतून रडतच घरी आली.  आल्या-आल्या हातपाय न धुता तशीच नाराज बसली.  देवघरातील अगरबत्तीचा सुवासाने तिला प्रसन्न वाटत होतं.  तरीही शाळेतल्या गोष्टीमुळे ती पुन्हा उदास झाली.  आईने तिला स्वच्छ हातपाय धुवून तयार होण्यास सांगितले.  छोटी चिनू आज्ञाधारक बाळाप्रमाणे तशीच उठून हातपाय धुण्यास गेली.  


गरम गरम शिऱ्याचा खमंग वासाने चिनुची मोठी ताई चिऊ बाहेर आली.  अभ्यास करून तिच्या खोलीतून नेहमीप्रमाणे नाश्ता करायला येत असताना तिचं लक्ष आपल्या छोट्या चीनुकडे गेलं.  आपल्या छोट्या बहिणीला असं रुसलेल बघून तिने आईला नजरेनेच काय झाले ते विचारले, त्यावर आईने डोळ्यांनीच थोडा वेळ थांब सांगितले.  


चिनू नाश्त्याला बसल्यावर आईने गोड हसून तिला हळूच साद घातली तशी चिनू आईला घट्ट बिलगली.


अगदी लहान निरागस बाळासारखं मुसमुसतच शाळेत निंबंध स्पर्धेतल्या तिचा क्रमांक कसा हुकला ते रडत रडत आईला सांगायला लागली.  चिनुला तस करताना पाहून चिऊ ताईला हसूच आले.  तसं आईने डोळे मोठे करून चिऊला गप्प केले आणि गोड हसून मायने चिनुच्या डोक्यावरून हात फिरवला.  


स्पर्धा नेहमी चालूच असतात.  क्रमांक हुकला म्हणून रडण्यापेक्षा तू स्पर्धेत सहभाग घेतलास हीच गोष्ट तुला पुढे यश देणार आहे.  


क्रमांक हुकला म्हणून त्यासाठी आज रडत बसून नाराज होण्यापेक्षा पुन्हा नव्या जोमाने तयार होऊन येणाऱ्या संधीला हसून साद घाल. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, आपण त्यात रंग भरले पाहिजे.


प्रत्येकाच्या बाबतीत छोट्या-मोठ्या गोष्टी कधी आपल्या मनासारख्या तर कधी मनाविरुद्ध होतच असतात.  


त्यातही गंम्मत म्हणजे प्रत्येक वेळी नवीन गुपित उलगडावं तसं नवीन ज्ञानाचं भांडार खुले होत असते.


म्हणतात ना, जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा अनेक मार्ग उघडे होत असतात.  फक्त आपल्याला ते शोधता आलं पाहिजे.


छोट्या छोट्या गोष्टीत रडण्यापेक्षा ऑप्टिमिस्टिक राहण्यात खरं सुख आहे.  त्या गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पाहिले पाहिजे.  तरंच खरी मज्जा! 


काय?  पटतंय ना!  


थोडा है, थोडे की जरुरत है|


आईचे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहून दोघींना नेहमीच खूप छान वाटायचं.   


आपल्या आईला जादू की झप्पी देत चिनू आणि चिऊ दोघींनीही हसून मान डोलावली आणि देवघरातील अगरबत्तीच्या सुंगांधासारखा विचारांतला सुंगंध प्रसन्नतेने सर्वत्र दरवळला.


                                                                - अनुप्रिया सावंत.

Tuesday 18 July 2023

कविता #२० - किमयागार

Photo: Google

           Photo courtesy: Google

(प्रस्तुत कविता 'दैनिक प्रत्यक्ष' वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे.)

          व्यक्ती तशी वल्ली तितक्याच प्रकृती.  माणसांमध्ये ही गोष्ट प्रत्येकाला पाहायला मिळतेच.  पण त्याच माणसांना खुलवणारा, हसवणारा, साद घालणारा आणि त्याच्यासोबत जुळवून घ्यायला शिकवणारा मात्र समोर असूनही अलिप्त राहत असतो तितकाच अलिप्त असूनही जवळ असतो.  म्हणूनच तर ह्याला 'किमयागार' म्हणतात.  बरोबर ना!  ह्याची जादूच निराळी.  जगायला शिकवणाराही हाच आणि जगताना अनुभवायला शिकवणाराही हाच.


 रोपट्यांनी साऱ्या फुलावे घट्ट मातीच्या साक्षीणे

फुला - फुलाने बहरावे वाऱ्याच्या सोबतीने!


चांदण्याची सारी शोभा निळ्या नभी चमकावी

मधूनच तारे - तारका त्याच्या सोबतीने असावे!


सर्व दिशांतले वारे घट्ट मिठीत विसावे

मंजुळ ध्वनीच्या लहरी त्यात डुलत राहावे!


खळखळाट नदीचा नाद चहू बाजूंनी गर्जितो

डोंगर दरी कपाऱ्यातून बेधुंद मुक्त संचारतो!


किमया ही किमयागाराची तोचि साधितो जाणावे

त्याच्या सोबतीने सारे आपण चालतची राहावे!!!

                                                         अनुप्रिया सावंत. 

Tuesday 9 May 2023

कविता #१९ - मागे वळून पाहताना...

(सदर कविता 'प्रत्यक्ष-बिगर राजकीय दैनिक वृत्तपत्र' मध्ये छापून आलेली आहे.)

     दिवसामागून दिवस जातच असतात. मिनिटामिनिटाच्या हिशोबात म्हणतात ना, वेळ कधी थांबत नाही.  तरी उगाच आपण बऱ्याचदा घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो.  जर-तर मध्ये काही तथ्य नसतेच, मात्र आपण त्यातच गुरफटत असतो.  हातात असणाऱ्या गोष्टींपेक्षा नसणाऱ्या गोष्टीत आपण जास्तच गुंतून राहतो.  चढ-उतार अगदी प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, पण मन आपणच कसे वेगळे हे सिद्ध करत राहतं.  बरोबर ना!  आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगता यायला हवं आणि जगताना ते अनुभवताही यायला हवं.  डिजिटलायझेशनच्या युगात सर्व शक्य आहे, फक्त त्याचा उचित वापर करता यायला हवं!  असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली, हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


 असावं असंच प्रत्येकाने पावलोपावली

जीवनाच्या वळणावर आस नित्य मनी

ध्यास असावा सोबती अन महत्वाकांक्षा

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


लाटा येती किनारी नि निघोनी जाती

फोडुनी टाकावी त्याच जिद्दीच्या बळाने

आहोटी आणि भरतीच्या ह्या विशाल भिंती

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


प्रवाहासोबत प्रवाहाविरुद्धही पोहावं लागते

वाराही जिथे बदलतो दिशा वादळी भीतीने

आपण मात्र संकटी ठाम असावं नक्की

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


आनंदाच्या हिंदोळ्यावर अनुभवाचे चीज

परिश्रमाचे साक्षीने रोवावे त्याचे बीज

कृतज्ञता ठेवुनी ठायी असावे निश्चिन्त

हसत रहावं नेहमी मागे वळून पाहताना...


                                   - अनुप्रिया सावंत.

Friday 21 October 2022

कविता #18 - स्वच्छंदी

     खरं तर लिहिण्यासारखे, व्यक्त होण्यासारखे प्रत्येकाकडे खूप काही असते. आवडीचे पदार्थ खायचे आहेत, बनवायचे आहेत, कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे, मैत्रिणी-मित्रांना भेटायचे आहे, भटकंती करायची आहे, लिहायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे, खूप काही छान छान गोष्टी करायच्या आहेत. सर्वात महत्वाचं स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. मात्र सगळं कळत असूनही हे आपलं मन मात्र अनेकानेक गोष्टीत अडकलेले राहिले आहे आणि त्यातून आऊटपुट काय? थोडं गंमतीत घ्यायचे झालं तर 'बाकी सब ठीक है| हो की नाही?

     आपल्या मनाला आपण खूप बांधून ठेवतो. एखादा निर्णय घ्यायची वेळ आली की मात्र एक नाही दोन नाही अनेक दगड समोर येऊन उभे राहतात आणि सुरु होते मनाची लहर! तुम्हाला म्हणून सांगते अगदीच 'कहर' आहे हो हे!  
तेवढ्यात मन गुणगुणू लागते... दगड दगड दगड दगड इकडे दगड तिकडे दगड... दगड दगड दगड दगड. थांबा थांबा..... तुम्ही लगेच चाल म्हणायलाच सुरुवात केली...

     खरं तर मीच खूप दिवसांनी माझ्या ब्लॉगला भेटायला आले आणि तिथे पुन्हा 
भेट झाली माझ्यातल्या हरवलेल्या 'मी' ची. असा 'मी' जो पुन्हा स्वतःला काही सांगू पाहत आहे, काहीतरी सुचवायचे आहे, काहीतरी पुन्हा त्या दुनियादारीत स्वतःलाच नव्याने पाहायचे आहे. कामे तर प्रत्येकाचीच चालू असतात. वेळ नसतोच, तो आपल्याला काढावा लागतो, हे माहित असूनही चालण्यातला वेग थोडासा कमी झालेला असतो. थोडासाच म्हटले, कारण नुसती गाडी चालू करून उपयोग नाही, ऍक्सिलेटरवर जोर धरावाच लागतो. आपल्यातला छंद आपण नाही जपला तर ह्या आपल्या 'स्वच्छंदी' मनाला साद कशी घालणार?



नको राग नको द्वेष,

नको लोभ विनाकारण त्वेष,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको थट्टा नको मस्करी,

नको हांजी कुणाची फुशारकी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


नको लालच नको बंधने,

नको खोटे नाते आश्वासने,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


रम्य चित्र संगीताची साथ,

नभी इंद्रधुनचा रंग खास,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


शुभ्र आकाश ढगांची बात,

पक्षी स्वैरावत मनमुराद गात,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


वेळेचे गणित बांधूनी गाठोडी,

स्वप्नांचे पंख घेऊनी भरारी,

अशीच मुक्त असावी स्वछंदी.


                                                      - अनुप्रिया सावंत


Tuesday 31 May 2022

व्याकरण - विरामचिन्हे

  


लिहिताना आपले हावभावआपल्या भावना व्यक्त करताना चिन्हांचा वापर करावा लागतो.  ह्याच चिन्हांना मराठी व्याकरणात आपण 'विरामचिन्हेअसे संबोधतो.

(WHENEVER WE EXPRESS OUR FEELINGS BY WRITING , WE HAVE TO USE SOME SYMBOLS AND THESE SYMBOLS ARE CALLED PUNCTUATION MARKS.)

Ø  "वाहकिती छान."

Ø  तुझे नाव काय आहे?

Ø  मी अनुप्रिया आहे.

वाक्य वाचताना आपल्याला त्या चिन्हांनुसार आवाजातील चढ उतार बदलताना जाणवतो.  आणि म्हणूनच आपल्याला त्या वाक्यांतील भाव ओळखण्यास मदत होते.  अशा चिन्हांच्या संचांना(Group) आपण 'विरामचिन्हे' म्हणतो.

 

v  लेखनात येणारी प्रमुख विरामचिन्हे अभ्यासुयात.

 

१. पूर्णविराम (.) – (Full Stop)

१. वाक्य/विधान पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी ह्याचा वापर करतात.

उदाहरणार्थ,

- माझे नाव अनुप्रिया आहे.


२. शब्दांचे संक्षिप्त रूप (In short) दर्शविण्यासाठी आद्याक्षरापुढे ह्याचा वापर करतात.

उदाहरणार्थ,

वि. वि. = (विनंती विशेष)

वि. दा. सावरकर = (विनायक दामोदर सावरकर)


२. स्वल्पविराम (,) - (Comma)

     एकाच प्रकारचे अनेक शब्द एकामागोमाग / लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.


उदाहरणार्थ,

छान, सुंदर, अप्रतिम आणि जबरदस्त काम केले आहेस.


- दुसऱ्याला उद्देशून/संबोधन करताना स्वल्पविराम वापरला जातो.

उदाहरणार्थ,

सीमा, हे पुस्तक वाच.

 

प्रश्न चिन्ह(?) – (Question Mark)

     प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिन्हाला प्रश्न चिन्ह असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

        तुझे नाव काय आहे?

        तू कुठे राहतोस?

 

उद्गारवाचक चिन्ह (!) – (Exclamation Mark)

             आनंददुःखआश्चर्यराग अशा भावना व्यक्त करताना शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्हांचा वापर करतात. 

उदाहरणार्थ,

अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.


अवतरण चिन्ह (") (‘) – (Quotation Mark)

     दुसऱ्यांचे म्हणणेमहत्वाचे शब्द दर्शविण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर करतात.

Ø  दुहेरी अवतरण चिन्ह (")

Ø  एकेरी अवतरण चिन्ह (‘)


एकेरी अवतरण चिन्ह (‘) - जेव्हा महत्वाच्या एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दर्शवायचा असेल तेव्हा एकेरी चिन्हांचा वापर करतात.

उदाहरणार्थ,

ü  साने गुरुजी ह्यांचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचनीय आहे.

ü  'ज्ञानेश्वर' हे थोर संत होते.

 

दुहेरी अवतरण चिन्ह (") - बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर केला जातो.

उदाहरणार्थ,

ü  शिक्षक म्हणाले"मुले अतिशय हुशार आहेत."


                                                                  - अनुप्रिया सावंत.

Sunday 24 April 2022

व्याकरण - भाषा व वर्ण



भाषा - विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे 'भाषा' होय.

(Language - It is a means of expressing thoughts.

साधन – Method/tool/way)

 

वर्ण - आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.

(वर्ण – Letter/character)

मूलध्वनी – Basic Sound)



मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत.  त्यांना 'मुळाक्षरे' किंवा 'वर्णमाला' असे म्हणतात.

('मुळाक्षरे' किंवा 'वर्णमाला' – Alphabets)

 

उदाहरणार्थ (Example),

हरीण – ह + अ + र + ई + ण + अ

           या ध्वनींना आपण 'वर्ण' म्हणतो.

                                                                - अनुप्रिया सावंत.

Monday 14 March 2022

व्याकरण - नाम(Noun)



‘नाम’ म्हणजे काय?  (What is Noun?)

     एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्यालानामअसे म्हणतात.

(Noun - A word that is the name of a thing, an idea, a place or a person.)


उदाहरणार्थ,

चित्रे पाहून तुमच्या लक्षात येईल नाम म्हणजे एखाद्या गोष्टीला/वस्तूला (object) दिलेले नाव होय.



खालील चित्रात काही वाक्ये व चित्रे आहेत. प्रत्येक गोष्टीला ओळखण्यासाठी आपण त्यानुसार नाव दिलेले आहे.  



नाम म्हणजे अशी गोष्टी की ज्याला ठराविक असे काही नावे दिली जातात.

नामाविषयी अजून काही उदाहरणे पाहुयात.

  • पुस्तक टेबलावर ठेव.
  • राघव बाजारात जा.
  • मुले घरी गेली.
  • घराशेजारी मोठी नदी वाहते.
  • विहीर मोठी आहे.
  • तलावात बदक पोहत आहेत.
  • निसर्ग सुंदर दिसत आहे.
  • झाडे हिरवीगार आहेत.
  • सिंह शूर प्राणी आहे.
  • समुद्र विशाल आहे.


वरील विधाने/वाक्ये (Sentences) वाचत असताना आपल्या लक्षात येते की, एकाच वाक्यात अनेक नामे आलेली आहेत आणि म्हणूनच ह्या नामाचे काही विशिष्ट प्रकारही येतात.


नामांचे प्रकार

नामांचे मुख्य तीन प्रकार आहेत.

१) सामान्यनाम

२) विशेषनाम

३) भाववाचक नाम



नामांचे प्रकार असेच सहज व समजायला सोप्या उदाहरणासहित अभ्यासुयात पुढील भागात.  


*मराठी व्याकरणासंदर्भातील तुमचा अभिप्राय नक्की कळवावा.*  

*ब्लॉगला कनेक्ट राहण्यासाठी ब्लॉग नक्की फॉलो (Follow) करा.*

*ब्लॉगवरील व्याकरणाचे विडिओ तुम्ही YouTube Channel वर पाहू शकता.*




                                                                     अनुप्रिया सावंत.



Saturday 12 March 2022

कविता #17 - शब्दांचे गुंफण


       'शब्द' अगदीच अडीच अक्षरांनी बनलेला.  हाच जेव्हा मनाच्या पटलावर उमटत जातो तेव्हा भावना अगदी मुक्त झाल्यासारख्या होतात.  मनात साठवून ठेवलेल्या अनेक विचारांना ह्या शब्दांसह जेव्हा मोकळी वाट मिळते तेव्हा मुक्तछंद पणे फक्त वाहत राहतात.  कधी आनंद, कधी प्रसन्नता, कधी क्लेश, कधी नाराजी, कधी हसणं तर कधी रडणं.  मानवी मन त्याच्या भावना सगळ्याच रसाने अगदी सरमिसळून जातात ते ह्याच शब्दांच्या आधाराने.  खरंय ना! 


     बऱ्याचदा आपल्याला सांगायचं असतं बरेच, पण शब्दांना काही केल्या पकडता येत नाही.  म्हणजे अगदीच म्हणायचं तर शब्दांचे सुद्धा लपंडाव चालूच असतात.  त्यांना पकडण्यासाठी पकडापकडी करत अगदी खो सुद्धा देता येतो.  ह्याच शब्दांच्या दुनियेत कधी दोन रन, कधी चार तर अगदी सिक्स मारून षटकार करताना अगदी भन्नाट मजा येते.  आणि आऊट झाल्यावर मात्र पुन्हा लपाछपी करत हेच शब्द आपल्याला भुलवतही राहतात.  आहे की नाही शब्दांची गंम्मत.  


शब्दांची गुंफण निरंतर अशीच बहरत जावो,

मनाच्या अंतरी प्रत्येक पटलावर रसिक वाचकहो,

सदाबहार नित्यनूतन अशीच सादर होत राहो,

ही माझी इच्छा असावी तुमची सदिच्छा!!!


दैनिक प्रत्यक्ष वर्तमानपत्रात दिनांक २७ फेब्रुवारी रोजी छापून आलेली ही माझी 'शब्दांची गुंफण' कविता तुम्हाला नक्कीच आवडेल.  तुमचा अभिप्राय नक्की कळवावा. 


शब्दांना शब्दांनी गुंफायला लागतो वेळ खरा,

मनाची भाषा कळायला नाही लागत बहाणा.


उमटत जातात पानांवर मुक्तहस्ताने ही अक्षरे,

जणू ओंजळीत भरलेल्या पारिजातकाच्या सुवासाने.


ठाव घेत मनी दडून बसलेला कल्लोळ भावनांचा,

उधळत चहू बाजूंनी सप्तरंग इंद्रधनू नभीचा.


पहुडावे मनाने ह्या सुखाच्या निद्राधीन,

नाते हृदय शब्दांचे होवो लेखणीच्या स्वाधीन.


विनावे शब्दांच्या धाग्यांनी जसे फुलाने बहरावे,

शब्दांच्या लपंडावामध्ये फक्त फुलतच राहावे.


                                                                                     - अनुप्रिया सावंत.


Friday 10 December 2021

ब्लॉग कसा करावा? - भाग १


      मागील सदरात डिजिटल माईंड व सोशल मिडिया याविषयी आपण जाणून घेताना सोशल मिडियाचे व्यापकत्व आणि त्याचे महत्व पाहिले.  आज या सदरात आपण बऱ्याच दिवसापासून उत्सुकता असलेल्या 'ब्लॉग' ह्या सदराविषयी सुरुवात करत आहोत.

     आपण प्रत्येक जण काही ना काही कामात असतोच.  कामाचे स्वरूप छोटे असू देत किंवा मोठे पण सतत तेच रुटिंग करताना कंटाळा हा येतोच. आणि त्यातही समाधान मिळविण्याच्या नादात आपण स्वतःलाच हरवून बसतो.  सर्व काही असूनही काही तरी खुपतंय, काहीतरी अजून करायला हवंय, आपण खूप मागे पडत चाललो आहोत, असे अनेक विचार मनात येताच राहतात आणि अशात जर कोणी आपल्याला काही बोललं तर उगाच आपण त्याच गोष्टी उगाळत आपल्या हातातला आहे तो वेळही घालवून बसतो. खूप गोष्टी असतात आपल्याकडे करण्यासाठी, पण आपल्याला त्या लक्षात येतच नाहीत.

  बघा ना!  आज इतक्या दिवसानंतर पुन्हा माझ्या ब्लॉगच्या विश्वाची सफर स्वतःच स्वतःला घडवताना मला जो आनंद झाला आणि त्यापेक्षा अधिक जो वैचारिक उत्साह ह्यातून मिळाला, तो शब्दांत मांडताच येत नाहीये.

     तुमचंही असंच काहीसे चालू आहे.  बरोबर ना?  त्याशिवाय का उगाच आज आपण ब्लॉगच्या माध्यमातून का होईना भेटलोच आहोत. हो ना!  हे लिहिताना सुद्धा बघा, किती साधारण विचार आहे; जो तुमच्या माझ्या मनात आला आहे.  आणि तोच विचार मी डिजिटल माध्यमातून मांडत आहे.  आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी असतात असं म्हणण्यापेक्षा आपल्याकडेच अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याच्या साहाय्याने आपण स्वतःला चांगल्या गोष्टीत गुंतवू शकतो.  स्व विकास साधायचा असेल, तर स्वतःला व्यक्त करता यायला हवं. आणि खरंच सांगते आपले विचार वाचताना जेव्हा इतरांना त्यातून प्रेरणा मिळते, त्याचा स्वतःला झालेला आनंद हा अमाप असतो.

     ब्लॉगच्या माध्यमातून स्वतःचे विचार, छंद, कला, आवड थेट दृश्य स्वरूपात सादर करण्याचे अनेकानेक प्रकार आहेत.   

मग करायची सुरुवात आपल्या स्वतःचा ब्लॉग लिहिण्याची!!!


     ब्लॉग म्हणजे खूप काही कठीण आहे.  त्याला बराच वेळ लागतो.  त्यासाठी खूप गोष्टी स्वतःजवळ असाव्या लागतात, असे खूप काही प्रश्न आपल्या मनात येऊन जातात.  त्यामुळे आपला स्वतःच्या ब्लॉग सुरु करण्याचा विषय आपण तिथेच सोडून देतो.  काहीतरी वेगळं आनंददायी करणे कुणाला नाही आवडणार!  ब्लॉग सुरु करण्याची ओढ, जिद्द आणि सातत्यता तुमच्यात असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच सुंदर ब्लॉग सुरु करू शकता.  माझ्या जवळ माहिती (कॉन्टेन्ट) नाही, त्यामुळे मला सुरुवात कशी करावी हे कळत नाही किंवा माहिती आहे पण ती सादर कशी करावी?  असे प्रश्न आता केव्हाच मागे पडले आहेत.  कारण त्याचसाठी तर आपला हा सदर आहे.  


     ब्लॉग म्हणजे काय?  ब्लॉग कसा असावा? ब्लॉगसाठी कोणती माहिती(कॉन्टेन्ट) आवश्यक असते?  ब्लॉगचा विषय कोणता?  ब्लॉगचे नाव?  ब्लॉगचे सादरीकरण ह्या प्रत्येक गोष्टींसंदर्भात आपण नक्कीच जास्तीत जास्त आणि सहजतेने कळेल अशा पद्धतीत जाणून घेणार आहोत पुढच्या सदरात.


आधीचे सदर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

डिजिटल माईंड - https://anupriyasawant.blogspot.com/2021/01/blog-post.html

सोशल मिडिया - https://anupriyasawant.blogspot.com/2020/11/social-media.html

इ - मेलचा वापर - https://anupriyasawant.blogspot.com/2020/04/EmailAccountPart2.html

इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी संदर्भात - https://anupriyasawant.blogspot.com/search/label/Information%20Technology 


                                          - अनुप्रिया सावंत.